हव ते शोधा

Custom Search

Wednesday, May 26, 2010

सफरचंद

सफरचंदाने ना फक्त पडायचे असते
करायची नसते काळजी फांदीवरचे इतर सोबती पिकल्याची-‍‍ना पिकल्याची
करायची नसते काळजी फांदीखालील बेसावध डोक्यांची
वेळ झाली कळताक्षणी सारा गर गोळा करून
फांदीवरच्या फलाटावरून झाडाचे गाव सोडायचे असते
सफरचंदाने ना फक्त पडायचे असते

मग ते पाहून कुणाला गुरुत्त्वाकर्षणाचा नियम सुचू देत-ना सुचू दे
सुचल्याच्या आनंदात तेच सफरचंद कापून खाऊ देत-न खाऊ दे
पडणाऱ्याचे नशीब वेगळे सुचणाऱ्याचे नशीब वेगळे
सुचणाऱ्यागत पडणाऱ्याने नोबेल‍‍-बिबेल मागायचे नसते
सफरचंदाने ना फक्त पडायचे असते

विचार नसतो करायचा की स्थितीज ऊर्जेची गतीज ऊर्जा कशी होते
नसते चिंतायचे की मरणासारखे त्वरण सुद्धा अंगभूत असते
नियम माहित असोत-नसोत नियमानुसारच सारे घडायचे असते
जर सफरचंद असेल तर त्याने टपकायचे असते
जर पृथ्वी असेत ते तिने ओढायचे असते
सफरचंदाने ना फक्त पडायचे असते

सफरचंदालाही असतीलच की स्वप्ने, की कुणीतरी हळूवार झेलावे
किंवा उगवावे थेट चंद्रावर, आणि मग पिसासारखे अलगद पडावे
पण एकेक असे पिकले स्वप्न वेळीच देठाशी खुरडायचे असते
अन् चिख्खल असो वा माती असो, दिवस असो वा रात्र असो, फळ असो वा दगड असो
एकाच वेगात मधले अंतर तोडायचे असते
सफरचंदाने ना फक्त पडायचे असते

No comments: