हव ते शोधा

Custom Search

Wednesday, May 26, 2010

मी मोर्चा नेला नाही

मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही
मी निषेध सुद्धा साधा, कधी नोंदवलेला नाही

भवताली संगर चाले, तो विस्फ़ारुन बघताना
कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्ताळून लढताना
मी दगड होउनी थिजलो, रस्त्याच्या बाजूस जेव्हा
तो मारायाला देखिल, मज कुणी उचलले नाही

नेमस्त झाड मी आहे, मूळ फ़ांद्या जिथल्या तेथे
पावसात हिरवा झालो, थंडीत झाडली पाने
पण पोटातून कुठलीही, खजिन्याची ढोली नाही
कुणी शस्त्र लपवले नाही, कधी गरूड बैसला नाही

धुतलेला सातिव सदरा, तुटलेली एकच गुंडी
टकलावर अजून रुळते, अदृश्य लांबशी शेंडी
मी पंतोजींना भ्यालो, मी देवालाही भ्यालो
मी मनात सुद्धा माझ्या, कधी दंगा केला नाही

मज जन्म फ़ळाचा मिळता, मी केळे झालो असतो
मी असतो जर का भाजी, तर भेंडी झालो असतो
मज चिरता चिरता कोणी, रडले वा हसले नाही
मी कांदा झालो नाही, आंबाही झालो नाही

1 comment:

Anonymous said...

Nice poem - Sudhir